सापुताऱ्यात महाराष्ट्रातून येणारा दारू साठा जप्त; सुरतचा एक जण अटकेत, दुसरा फरार
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सापुताऱ्यात महाराष्ट्रातून येणारा दारू साठा जप्त; सुरतचा एक जण अटकेत, दुसरा फरार
सापुतारा पोलीस ठाण्याचे पीआय पी. डी. गोंडलिया यांच्या पथकाने राबविलेल्या वाहन तपासणी मोहिमेत महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या दारूच्या मोठ्या साठ्यावर कारवाई करत एकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या दिशेने येणारा अशोक लेलंड ‘छोटा हत्ती’ मिनी टेम्पो (क्रमांक GJ-01-DY-7741) संशयावरून थांबविण्यात आला. तपासणीदरम्यान टेम्पोच्या रिकाम्या फलकावर ताडपत्री गुंडाळून त्यामागे विदेशी दारूचा साठा लपवून ठेवलेला आढळून आला.
पोलीसांनी टेम्पोमधून भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या व्हिस्की आणि व्होडक्याच्या एकूण ११५२ बाटल्या (२०७.३६ लिटर) जप्त केल्या. या दारूची किंमत सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रुपये इतकी आहे. तसेच २ लाख रुपयांचा टेम्पो, १,४५० रुपये रोख रक्कम व एक मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टेम्पो चालक उपेंद्र छटू प्रसाद (भगत) (सध्या राहणार किम परिसर, सुरत; मूळ रहिवासी बिहार) याला अटक करण्यात आली आहे. तर दारू तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेला ज्ञानेश्वर उर्फ अनिल उर्फ चिकना दयाराम पाटील (रा. लिम्बायत, सुरत) यास पोलिसांनी फरार आरोपी घोषित केले असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी सापुतारा पोलीस अधिक तपास करत आहेत.



