नाकोडे वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांचा कळवण प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

नाकोडे वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांचा कळवण प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या नाकोडे शासकीय विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत कळवण प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला.
शासनाच्या नियमानुसार दररोज अंडी, केळी, दूध आदी पोषक आहार देणे बंधनकारक असतानाही अन्नपुरवठा नियमित होत नसून, अनेकदा दुधाऐवजी ‘पांढरे पाणी’ दिले जाते. भात आणि भाज्यांचा दर्जा अत्यंत खराब असून, जेवणास दुर्गंधी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. भोजन पुरवठा करणारा ठेकेदार कमी दर्जाचे अन्न देऊन शासनाच्या निधीचा गैरवापर करीत असल्याची गंभीर तक्रारही विद्यार्थ्यांनी मांडली. या ठेकेदाराविरुद्ध तात्काळ कारवाई करून भोजनाचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, वस्तीगृहातील गृहपालाकडून विद्यार्थ्यांशी अपमानास्पद वागणूक केली जाते, तक्रार केल्यास धाक दाखवला जातो, शिवीगाळ केली जाते, असे धक्कादायक आरोपही मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर केले. मोर्चाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना लिखित निवेदन देत, “योग्य पोषक आहार, स्वच्छ व सुरक्षित वातावरण आणि नियमबद्ध भोजन मिळाले नाही तर आम्ही आमरण उपोषण करू,” असा इशारा दिला. या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ माजली असून, प्रकल्प कार्यालयाने तत्काळ चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी “आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष बदल हवा” असा ठाम आग्रह धरला. मोर्चात बेबिलाल हाडस, काळू गवळी, सुनील भोये, कमलेश आहेर, खुशाल गवळी, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर पवार, खुशाल चौरे, योगेश महाले, गणेश गवित, वैभव गायकवाड, ईश्वर महाले, श्रावण चोरे, सखाराम दळवी आदी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.


