निंबारपाडा संघ एमसीए चॅम्पियन ट्रॉफी २०२५चा विजेता; ४८ संघांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी | बोरगाव, लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा येथे एमसीए चॅम्पियन ट्रॉफी २०२५ ही भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. सात दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण ४८ संघांनी सहभाग घेतला होता.
अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत निंबारपाडा संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या निंबारपाडा संघाला ५० हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील उपविजेतेपदाचा मान हतगड येथील शिवनेरी संघाने पटकावला. त्यांना २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. झुंडीपाडा येथील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला असून १५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले.
समारोप व बक्षीस वितरण सोहळा मान्यवर मनोज महाले व नितीन थोरात यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीसाठी मॅन ऑफ द सिरीज नवनाथ पवार (हतगड), उत्कृष्ट बॉलर एल. पातळ तसेच उत्कृष्ट बॅट्समन मनोज महाले यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी स्पर्धेचे आयोजन मनोज महाले, गणेश वाघेरे, नितीन थोरात व अजित महाले यांनी केले होते. स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून क्रीडाक्षेत्राला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.√