शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद! पिंपळसोंड शाळेसाठी संतप्त विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा — पंचायत समितीवर आज धडक
🚩 शिक्षक द्या, अन्यथा शाळा बंद!
पिंपळसोंड शाळेसाठी संतप्त विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा — पंचायत समितीवर आज धडक 🚩
सुरगाणा तालुक्यातील आदिवासीबहुल पिंपळसोंड येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता गंभीर बनली असून याविरोधात अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. नवीन शिक्षक तात्काळ नियुक्त करा या मागणीसाठी आज पिंपळसोंड येथून पायी मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा थेट सुरगाणा पंचायत समितीवर धडकणार आहे.
शाळेत पुरेसा शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे.
“शिक्षक नाही तर शिक्षण कसे?” असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी पंचायत समिती प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
आता पंचायत समिती प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेते की पुन्हा एकदा ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे दुर्लक्ष होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



