सटाणा तालुक्यातील जुनी शेमळी येथे हातभट्टीच्या दारूमुळे सात जणांना विषबाधा; तालुक्यात खळबळ

हातभट्टीच्या दारूमुळे सात जणांना विषबाधा; तालुक्यात खळबळ
सटाणा तालुक्यातील जुनी शेमळी येथे हातभट्टीची दारू प्यायल्याने सात जणांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार बुधवारी (दि. २४) रात्री उघडकीस आला. या घटनेत दोन जणांची प्रकृती सुधारली असून, उर्वरित पाच जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जुनी शेमळी येथील अमृत जगताप (४३), साजण लोंढे (३०), प्रवीण पवार (३५), राहुल पवार (३२), अजय पवार (४०), शरद पवार (५२) व योगेश पगारे (४२) या सात जणांनी बुधवारी रात्री गावाबाहेरून आणलेली हातभट्टीची दारू प्राशन केली होती. दारूचे अतिसेवन केल्यानंतर अचानक सर्वांची प्रकृती बिघडली. यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात तसेच घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. यातील दोन जणांची प्रकृती सुधारल्याने गुरुवारी (दि. २५) त्यांना घरी सोडण्यात आले. उर्वरित बाधितांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
ग्रामपंचायतीने दारूबंदी लागू केली असतानाही ही दारू कुठून व कशी मिळाली, याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
“जुनी शेमळी येथील घटनेनंतर इतरत्र कुठेही अवैधरीत्या दारूनिर्मिती किंवा विक्री होत असल्यास ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आवाहन पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने ग्रामीण भागात कमी खर्चातील हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होते. मात्र ती तयार करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने अशी दारू आरोग्यासाठी घातक ठरून जीवही जाऊ शकतो. जुनी शेमळीतील घटनेने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


