आपला जिल्हा
ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतीतून गुही आश्रमशाळेत साकारला ‘शिवकाळ’

ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृतीतून गुही आश्रमशाळेत साकारला ‘शिवकाळ’
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र संचलित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गुही ता. सुरगाणा जि. नाशिक येथे शासनाच्या स्तुत्य ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचे औचित्य साधून एक उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेविषयी ज्ञान वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने, मातीचे किल्ले बनवण्याचा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. गुही आश्रमशाळेतील उपक्रमशील शिक्षक मुकुंदा पवार यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हाती माती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून अचूकतेने आणि कौशल्याने रायगड, प्रतापगड, जंजिरा, तोरणा, सिंहगड, राजगड यांसारख्या दुर्गरत्नांची मनमोहक प्रतिकृती तयार करून घेतली. या उपक्रमाने आश्रमशाळेच्या प्रांगणात जणू लघु-शिवकाळच अवतरल्याचा अनुभव आला.
प्रतिकृती तयार झाल्यानंतर, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक परशुराम गावित यांनी या किल्ल्यांचे महत्त्व, इतिहास आणि त्यामागील प्रेरणादायी गाथा विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ किल्ले बांधण्याचे नाही, तर त्यामागचा राष्ट्रभक्तीचा विचार आत्मसात करता आला. या सर्जनशील उपक्रमासाठी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गावित यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि इतिहासाचे सखोल ज्ञान देणारा हा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहील.


