भयानक! ४० आश्रमशाळांतील विद्यार्थी थंडीत गारठले; सोलर वॉटर हिटर पूर्णपणे ठप्प
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

भयानक! ४० आश्रमशाळांतील विद्यार्थी थंडीत गारठले; सोलर वॉटर हिटर पूर्णपणे ठप्प
कळवण प्रकल्प – कडाक्याची थंडी आणि त्यातही गार पाण्याने आंघोळ करण्याची वेळ… आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्पातील तब्बल ४० शासकीय आश्रमशाळांमध्ये सोलर वॉटर हिटर दहा वर्षांपासून देखभालअभावी बंद पडल्याने ३०० ते ६०० विद्यार्थ्यांची दैनंदिन होरपळ सुरू आहे.
राज्य शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या निवास व सुविधांसाठी या शाळांमध्ये सौरऊर्जेवर चालणारी पाणी-गरम यंत्रणा बसवली होती. मात्र दशकभरात एकदाही दुरुस्ती न झाल्याने बहुतेक मशीनरी निकामी झाली आहे.
आता थंडीची तीव्रता वाढली असताना विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागत आहे. अनेक विद्यार्थी थंडीच्या भीतीने आंघोळीला टाळाटाळ करतात, याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
अनेक अडचणींचा डोंगर
सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव व चांदवड या तालुक्यांचा समावेश असलेल्या कळवण प्रकल्पात आश्रमशाळांच्या समस्या सतत समोर येत आहेत. वैद्यकीय सुविधा, मध्यान्ह भोजन, निवासव्यवस्था अशा अनेक मूलभूत गोष्टींच्या तक्रारी पूर्वीपासूनच आहेत. आता त्यात वॉटर हिटरची अडचण भर पडत आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
गार पाण्यामुळे लहान मुले रोज आंघोळ टाळतात. “सोलर वॉटर हिटर महिन्यांपासून बंद आहेत, गार पाण्याने आंघोळ करावी लागते,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
तातडीने लक्ष देण्याची मागणी
थंडीचा कडाका वाढत असताना या विद्यार्थ्यांची होरपळ वाढत आहे. पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व सोलर वॉटर हिटर तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


