अज्ञात वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय बिबट्याचा मृत्यू; शवविच्छेदनानंतर दहन, तपास सुरू

अज्ञात वाहनाच्या धडकेत ११ वर्षीय बिबट्याचा मृत्यू; शवविच्छेदनानंतर दहन, तपास सुरू
वणी परिसरातील खेडले शिवारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अकरा वर्षांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लखमापूर–कोशिंबे रस्त्यालगत गट क्रमांक 208 मध्ये मंगळवारी रात्री सुमारास ही घटना घडली.
बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती सकाळी ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात अवजड वाहनाने धडक दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून सदर अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.
वनविभागाने मृत बिबट्याला वणी येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पन्हाळे यांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नियमांनुसार मृत बिबट्याचे दहन पार पडले.कारवाईदरम्यान वनपरीक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, पंकज परदेशी, श्रावण कामडी, ज्योती झिरवाळ, भोये, अप्पा शिरसाठ, बापु शिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.बिबट्याच्या अनपेक्षित मृत्यूमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून या घटनेमागील कारणांवर तर्कवितर्क सुरू आहेत. वनविभाग पुढील तपास करत आहे.



