थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना वाढती मागणी
¢सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये सातत्याने वाढ होत असून, पहाटे गारठा, दुपारी ऊन आणि पुन्हा रात्री गारवा असा त्रिस्तरीय अनुभव नागरिक घेत आहेत. त्यामुळे शरीराचे संरक्षण करण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत.
¢¢थंडीमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा आजारांनी त्रस्त होणाऱ्यांची संख्या वाढली असून, खासगी तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. तापमानातील चढउतारामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने नागरिक आरोग्याची विशेष काळजी घेत आहेत.
दरम्यान, उबदार कपड्यांच्या दुकानांमध्ये चादरी, स्वेटर, मफलर, जॅकेट, कानटोपी आदी वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. विक्रेत्यांच्या मते, थंडीचा जोर आणखी वाढल्यास येत्या काही दिवसांत या वस्तूंच्या विक्रीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.