नाशिक–सापुतारा रस्ता होणार फोर लेन; पर्यटन व वाहतुकीला नवी गती
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

नाशिक–सापुतारा रस्ता होणार फोर लेन; पर्यटन व वाहतुकीला नवी गती
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या दळणवळणात मोठा बदल घडणार आहे. नाशिक ते वणी या रस्त्याच्या चौपदरीकरणास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच कोट्यवधी रुपयांची मंजुरी दिली असताना, आता वणी ते गुजरात सीमेलगत असलेल्या सापुतारा या सुमारे १७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गालाही चौपदरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे नाशिक ते सापुतारा हा संपूर्ण मार्ग फोर लेन होऊन वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे.
या मार्गाच्या चौपदरीकरणामुळे नाशिक ते वणी, हातगड आणि पुढे सापुतारा हा प्रवास अधिक सुलभ होणार असून, कुंभमेळ्याच्या काळात होणारी प्रचंड वाहतूक सुरळीतपणे हाताळण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
पर्यटनवृद्धीला मिळणार चालना
नाशिक–सापुतारा फोर लेन रस्ता पूर्ण झाल्यानंतर पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. सध्या वणी ते हातगड हा मार्ग दुहेरी व घाटाचा असल्याने पर्यटकांचा ओघ मर्यादित आहे. मात्र, चौपदरी रस्त्यामुळे हा अडथळा दूर होणार असून हातगड परिसर सापुताराला उत्तम पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील निसर्गरम्य हातगड परिसरात पर्यटन विकासाला मोठी संधी मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
एकूणच, नाशिक ते सापुतारा फोर लेन रस्ता हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित न राहता, कुंभमेळा, पर्यटन आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


