# रस्त्यांत खड्डे की ‘कमाईचे खजिने’? सुरगाण्यात कोट्यवधींचा खेळ उघड! – आवाज जनतेचा
आपला जिल्हा

रस्त्यांत खड्डे की ‘कमाईचे खजिने’? सुरगाण्यात कोट्यवधींचा खेळ उघड!

दरवर्षी खर्च कोटींचा… तरी रस्ते ‘मरणयातनेत’; निकृष्ट कामे आणि ठेकेदारांच्या संगनमतावर प्रश्नचिन्ह

 रस्त्यांत खड्डे की ‘कमाईचे खजिने’? सुरगाण्यात कोट्यवधींचा खेळ उघड!

दरवर्षी खर्च कोटींचा… तरी रस्ते ‘मरणयातनेत’; निकृष्ट कामे आणि ठेकेदारांच्या संगनमतावर प्रश्नचिन्ह

सुरगाणा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, या रस्त्यांमध्ये केवळ खड्डेच नाहीत तर मोठे ‘अर्थकारण’ दडले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यातील बहुतांश रस्ते पावसाळ्यानंतर अक्षरशः उखडून निघतात. परिणामी नागरिकांना ‘मरणयातना’ सहन करत प्रवास करावा लागत आहे.
पावसाळा आला की रस्त्यांची चाळण होते आणि नंतर खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कामे केली जातात. मात्र ही कामे किती दर्जेदार होतात, हा मोठा प्रश्न आहे. काही ठिकाणी काँक्रिट रस्ते झाले असले तरी ते निसरडे बनून अपघातांना आमंत्रण देत आहेत. तर डांबरी रस्त्यांची अवस्था काही महिन्यांतच दयनीय होत आहे.
विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची कामेही केवळ दिखाव्यासाठी केली जात असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, खड्डे बुजवताना योग्य तंत्र वापरणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात खड्ड्यांत फक्त डांबरमिश्रित खडी टाकून काम उरकले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे काही दिवसांतच ते पुन्हा उखडतात.
दरम्यान, बांधकाम विभागाकडून दरवर्षी नवीन रस्त्यांची कामे केली जात असली तरी त्यांचा दर्जा संशयास्पद असल्याची तक्रार आहे. रस्ते असे बांधले जातात की पुढील पावसाळ्यातच ते पुन्हा दुरुस्तीला यावेत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
चौकट : वरकमाईवरच भर…
रस्ते बांधकामाची कंत्राटे बहुतांश वेळा राजकीय जवळच्या ठेकेदारांना दिली जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. रस्ते लवकर खराब व्हावेत आणि पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली निधी मिळावा, अशी साखळीच तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका रस्त्यावर वारंवार खर्च होत असून ‘वरकमाई’चे गणित अधिकच बळकट होत आहे.
निकषांचे पालनच नाही
नियमांनुसार खडीकरणाची जाडी, डांबराचे प्रमाण, तसेच प्रयोगशाळेत नमुने तपासणे आवश्यक असते. काम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासणीही केली जाते. मात्र प्रत्यक्षात या निकषांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसते. परिणामी कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था सुधारत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांचा सवाल :
“रस्ते सुधारण्यासाठी निधी येतो कुठे आणि जातो कुठे?”
सुरगाण्यातील नागरिक आता या प्रश्नाचे उत्तर मागत असून, निकृष्ट कामांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!