आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात संविधान दिन उत्साहात साजरा संविधान अभ्यासाने माणूस सक्षम, प्रगल्भ बनतो – पोलीस निरीक्षक विनोद पाटील
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

“संविधानाचा अभ्यास माणसाला सक्षम व प्रगल्भ बनवतो,” असे मत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृह, सुरगाणा येथे आयोजित “जागर संविधानाचा” या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय तायडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक विनोद पाटील, वक्ते रतन चौधरी, गृहपाल प्रज्ञा सकपाळ तायडे, ए.जी. काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
निरीक्षक पाटील म्हणाले, “न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांमुळेच आपण प्रगत लोकशाही आहोत. मी स्वतः या मूल्यांच्या बळावर येथे पोहोचलो. भारताचे संविधान हा सर्व ग्रंथांतील सर्वात सुंदर व मौल्यवान राष्ट्रग्रंथ असून त्याचा प्रसार करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे.” त्यांनी मुलींनी शिक्षणाची कास धरावी, एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब सुजाण बनते, असेही सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रतिकेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. विद्यार्थिनी अंजली वाडेकर हिने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. वक्ते रतन चौधरी यांनी संविधानाची रचना, वैशिष्ट्ये, मूलभूत तत्त्वे, घटना दुरुस्ती व संविधानाने दिलेले अधिकार याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी टी.सी. चौधरी, गोकुळ माळी, व्ही.डी. पगार, एस.जी. पाटील, मोहन जमाले, एस.पी. वायकर, पी.डी. पाटील, पी.आर. कनोजे, एकनाथ पेटार, टी.एस. चौधरी, अपर्णा मावची, राधिका वसावे, सिमरन वसावे, चिंतामण चौधरी, कैलास गायकवाड, प्रमिला हाडस आदींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी हिने केले.



