आपला जिल्हा
सुरगाणा तालुक्यातील चिचंदा गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून ५३ फिरत्या ड्रमचे वाटप
ठाणगाव प्रतिनिधी नामदेव पाडवी

सुरगाणा तालुक्यातील चिचंदा गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून ५३ फिरत्या ड्रमचे वाटप
सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भवाडा अंतर्गत चिचंदा येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून ५३ फिरत्या जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले.
याआधीच वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले यांनी चिचंदा गावाला भेट देत खरी परिस्थिती जाणून घेतली होती. गावातील सर्व वस्तीची पाहणी करून, महिलांना व विद्यार्थिनींना पाण्यासाठी करावी लागणारी पायी धडपड समजून घेतल्यानंतर जलचक्री वितरणाचा निर्णय घेण्यात आला. पाण्यासाठी दररोजची पायपीट थांबावी आणि मुलींच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले.
वाटपावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. फिरत्या जलचक्रीमुळे त्यांचा वेळ, श्रम वाचणार असून कष्टातही मोठी बचत होणार आहे. या कार्यक्रमास वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर, ओम भालेराव, मुंजा कारके, जलपरिषद मित्र नामदेव पाडवी, मोतीराम पालवी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील महिलांनी उत्तम नियोजन करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया
“आधी डोक्यावर हंडा घेऊन दूरवर पाणी आणावे लागायचे. त्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, मणक्याचा त्रास सोसावा लागत होता. पण आता जलचक्रीमुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला. आम्ही वेल्स ऑन व्हील्स संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो.”
— निर्मला गवळी, चिचंदा
“उन्हाळ्यात गावात भीषण पाणीटंचाई असते. रात्री जंगलात झऱ्यावर जाऊन पाणी भरावे लागायचे. मुलींनाही डोक्यावर पाणी आणावे लागते. व्हील ड्रममुळे वेळ वाचेल आणि अभ्यासास वेळ देता येईल.”
— यशोदा तुंबडे, चिचंदा


