आमदार नितीन पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करा
नगराध्यक्ष, नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे

आमदार नितीन पवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करा
नगराध्यक्ष, नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे
कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी मागणी कळवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्यासह नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्यात अजित पवार यांना उघडपणे पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ते अग्रस्थानी होते. पहाटेच्या शपथविधीतही त्यांनी अजित पवार यांची साथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय असून, मितभाषी स्वभाव, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे ते लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात.
कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा व मालेगाव या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा जनाधार आहे. या भागात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आमदार नितीन पवार यांना मंत्रिपद दिल्यास पक्षाला बळकटी मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीसाठी कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे संचालक धनंजय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कुंदन हिरे, शहराध्यक्ष रोहित पगार, माजी प्रथम नगराध्यक्षा सुनिता पगार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक राहुल पगार, गौरव पगार, माजी नगरसेवक जयेश पगार, नगरसेविका हर्षली पगार, ज्योत्स्ना जाधव, लता निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राहुल कदम, सागर खैरनार आदींच्या सह्या आहेत.


