फार्मर कप 2026 पूर्वतयारीसाठी सुरगाण्यात जनजागृती बैठक उत्साहात
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

फार्मर कप 2026 पूर्वतयारीसाठी सुरगाण्यात जनजागृती बैठक उत्साहात
सुरगाणा : पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सुरगाण्यातील दुर्गादेवी मंदिराजवळील सभागृहात जनजागृती बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फार्मर कप स्पर्धेत राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, तसेच त्यांना आधुनिक व सुधारित शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन पाणी फाउंडेशनचे वरिष्ठ प्रशिक्षक राजेश हिवरे, तसेच अजिंक्य गुरव, कल्याणी माळी आणि मनीषा राजगुरू यांनी केले.
प्रशिक्षणादरम्यान लोकचळवळीतून शेतीतील समस्या सोडविणे, ग्रामीण भागातील उपजीविका सुधारणा, गटशेतीची अंमलबजावणी, हवामान अनुकूल शेती पद्धती आणि उत्पादन वाढवून नफ्यात वाढ करण्याच्या उपायांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी निवासी प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची नोंदणीही याच ठिकाणी करण्यात आली.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, आत्मा बिटिम, महिला आर्थिक विकास महामंडळाचे CMRP, तसेच विविध शेतकरी गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—



