सुरगाणा तालुक्यातील साजोळे ग्रामपंचायतीत ‘माझा गाव माझा अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

सुरगाणा तालुक्यातील साजोळे ग्रामपंचायतीत ‘माझा गाव माझा अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या माझा गाव माझा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत साजोळे (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे विविध उपक्रमांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उल्लेखनीय प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात ‘अशी माझी विद्यार्थी मेळावा’, आपले सेवक आपला सन्मान, शासकीय व निवृत्त कर्मचारी मेळावा तसेच सत्कार समारंभ पार पडले. यावेळी ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाविषयी सविस्तर माहिती देत अभियान काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा समजावून सांगण्यात आली.
अभियानाच्या महत्त्वाच्या निर्णयांतर्गत, ग्रामपंचायतीची थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या विकासासाठी लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ४०,००० रुपयांची लोकवर्गणी ग्रामपंचायतीकडे जमा केली. या निधीतून गावातील शिक्षण व आरोग्यविषयक कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मेळाव्याच्या निमित्ताने गावातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडविण्यात आले. बाहेरगावी नोकरी करणाऱ्या गावातील कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभही खास आकर्षण ठरला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या ‘नवचेतना अभियान’ अंतर्गत विधवा व एकल मातांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला उपसरपंच पुष्पा गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड, मंगल दळवी, सविता भोये, पंढरीनाथ गांगुर्डे, बोरगावचे ग्रामसेवक सुकदेव बागुल, अशोक गवळी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, ग्रामविकास अधिकारी वैशाली देवरे, देविदास गावित, कोल्हे सर, रामदास गावित, काळू बागुल ,काळीबाई गांगुर्डे, दत्तू गावित, हरिचंद्र गावित तसेच विविध विभागांचे कर्मचारी, महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायतीत समाधान व्यक्त करण्यात आले असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी दाखविलेल्या सहभागाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


