अलंगुणचा पंढरीनाथ चौधरी महाराष्ट्राच्या खो-खो संघात निवड
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

अलंगुणचा पंढरीनाथ चौधरी महाराष्ट्राच्या खो-खो संघात निवड
जबलपूर (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात अलंगुण येथील पंढरीनाथ हिरामण चौधरी याची निवड झाली आहे. तो आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगून या संस्थेच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, अलंगुन (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.
पंढरीनाथ हा गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असून निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना त्याने खेळात सातत्याने प्रगती साधली. सकाळ-संध्याकाळ मैदानावर कसून सराव करत त्याने खो-खोमधील आक्रमण व बचाव या दोन्ही कौशल्यांत प्रभावी खेळ सादर केला. तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत त्याने आपली छाप पाडली. त्याच्या अष्टपैलू खेळाची दखल घेत खो-खो निवड समितीने त्याची महाराष्ट्र संघात अष्टपैलू राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड केली आहे.
पंढरीनाथला अलंगुण आश्रमशाळेच्या मैदानावर क्रीडाशिक्षक निवृत्ती लांडगे, योगेश माळवाळ, रामचंद्र गांगुर्डे तसेच नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे मार्गदर्शन लाभले.
पंढरीनाथ चौधरी याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे. पी. गावित, संचालक मंडळ समन्वयक, शालेय नियोजन समिती अध्यक्ष कॉ. वसंतराव बागुल, गावचे सरपंच हिरामण गावीत, माजी सभापती इंद्रजीत गावित, आश्रमशाळा प्राचार्य कैलास वाकचौरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब जाधव तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



