आदिवासी शेतकऱ्यांचा पुणे–सातारा अभ्यास दौरा
स्ट्रॉबेरी लागवड व प्रक्रिया उद्योगाचे घेणार प्रत्यक्ष धडे

आदिवासी शेतकऱ्यांचा पुणे–सातारा अभ्यास दौरा
स्ट्रॉबेरी लागवड व प्रक्रिया उद्योगाचे घेणार प्रत्यक्ष धडे
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील प्रगतशील शेतकरी सोमवारी (ता. २२) पुणे व सातारा येथे चार दिवसीय अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाची आधुनिक लागवड पद्धत, प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच संशोधन केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून सखोल माहिती घेणार आहेत.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांना रवाना केले.
यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अभ्यास दौऱ्यातून स्ट्रॉबेरी लागवड व प्रक्रिया उद्योगाबाबत मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्या भागात प्रभावी अवलंब करावा, तसेच इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिकच्या एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, प्रकल्प उपसंचालक संदीप वळवी, स्मार्ट नाशिकचे प्रकल्प अधिकारी विजय पवार, आदिवासी विकास विभागाचे शांताराम दाभाडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अभ्यास दौऱ्यात दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील सप्तश्रृंगी शेतकरी उत्पादक कंपनी आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव स्ट्रॉबेरी शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रत्येकी ४० सदस्य सहभागी झाले आहेत. पुणे व सातारा जिल्ह्यातील यशस्वी स्ट्रॉबेरी लागवडीची मॉडेल पाहून आदिवासी भागात नवे प्रयोग राबवले जातील, अशी अपेक्षा प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद यांनी व्यक्त केली.



