
गोळाखाल येथे राष्ट्रीय पेसा दिन उत्साहात
बोरगाव । लक्ष्मण बागूल
पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायद्यास (पेसा) संदा २९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २४) कळवण तालुक्यातील गोळाखाल ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी वंदना सोनवणे होत्या.
अनुसूचित क्षेत्रांमधील पंचायतींना स्व शासनाचा अधिकार, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील हक्क व लोकशाहीची खरी ताकद बहाल करणाऱ्या या कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार कार्यक्रमात आदिवासी गीत व नृत्य सादर करण्यात आले. यावेळी गोळाखालचे सरपंच प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, पेसा ग्रामसभा कोष समिती, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील रामदास पवार यांनी पेसा कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल गटविकास अधिकारी वंदना सोनवणे व विस्तार अधिकारी युवराज सोनवणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वंदना सोनवणे यांनी पेसा कायद्यामागील मूलभूत संकल्पना, पंचायत व ग्रामसभा निर्णयप्रक्रियेचे केंद्रबिंदू बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी युवराज सोनवणे यांनी गावविकास आराखड्याबाबत माहिती दिली. स्वदेस फाउंडेशनचे अनिल म्हस्के यांनी संस्थेच्या कामाची संकल्पना मांडली. तालुका व्यवस्थापक मीरा पाटील यांनी पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सुकदेव भोये, नामदेव ठाकरे, विठ्ठल साबळे, ग्रामपंचायत अधिकारी संजय चव्हाण, विजय पवार व तालुका व्यवस्थापक मीरा पाटील, मोबीलायाझर जनाबाई पवार यांनी केले. कार्यक्रमास सरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, विद्यार्थी उपस्थित होते.



