आकांक्षी तालुका अंतर्गत केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांची बोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांना भेट
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

आकांक्षी तालुका अंतर्गत केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांची बोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांना भेट
आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत केंद्रीय प्रभारी अधिकारी (CPO) यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध शासकीय कार्यालयांची पाहणी करत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा सखोल आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शासकीय कार्यालयांची पाहणी करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता व ग्रामविकासाशी संबंधित कामांची सद्यस्थिती तपासून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांनी दिल्या.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत की नाही, यावर विशेष भर देण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी तालुका प्रशासनातील अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच , ग्रामविकास अधिकारी सुकदेव बागुल, महिला बचत गट, कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. आकांक्षी तालुका कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



