इगतपुरीचे माजी आमदार पांडुरंग गांगड ७३ व्या वर्षी बोहल्यावर

*इगतपुरीचे माजी आमदार पांडुरंग गांगड ७३ व्या वर्षी बोहल्यावर*
इगतपुरी–त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड (वय ७३) यांनी आयुष्याच्या संध्याकाळी दुसऱ्यांदा विवाह करत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर समाजासाठीही एक सकारात्मक संदेश दिला. पत्नीच्या निधनानंतर अनेक वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या बाबांनी, कुटुंबीय तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतला. कासार घाट येथील तेलमवाडी (ता. शहापूर) येथील शेवंताबाई भले (वय ६०) या निराधार असून मोलमजुरी करून जीवन जगत होत्या. वृद्धापकाळात तब्येतीचा सांभाळ, दैनंदिन जीवनातील सोबत आणि मानसिक आधार मिळावा, या भावनेतून बाबांनी त्यांच्याबरोबर पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला. या विवाहसोहळ्यात भावनांची ओल होती, तशीच विनोदाची फुलबाजीही झाली. राजकारणात विरोधक बदलणं सोपं, पण आयुष्यात सोबत बदलणं अवघड; बाबांनी तेही करून दाखवलं, अशी मिश्कील टिप्पणी होताच मंडपात हशा पिकला. या सोहळ्याला माजी आमदार शिवराम झोले, माजी सभापती रघुनाथ तोकडे, संपत काळे, पांडुरंग शिंदे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर झोले यांनीही दुसरा विवाह केला होता. एकटेपणा हा आजार असतो आणि साथ हेच त्यावरची खरे औषध आहे,” असे सांगत त्यांनी पांडुरंगबाबांना शुभेच्छा दिल्या



