सुरगाणा तालुक्यातील करंजूल क येथील शासकीय आश्रम शाळेत भीषण अनागोंदी; विद्यार्थ्यांच्या आरोग्य व हक्कांशी खेळ — आमदार नितीन पवार यांचे कारवाईचे आदेश

सुरगाणा तालुक्यातील करंजूल क येथील शासकीय आश्रम शाळेत भीषण अनागोंदी; विद्यार्थ्यांच्या आरोग्य व हक्कांशी खेळ — आमदार नितीन पवार यांचे कारवाईचे आदेश
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
ता. सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा करंजुल (क) येथे केलेल्या पाहणीत प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नसल्याचे चित्र समोर आले असून, आश्रम शाळेतील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाळेत दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून आहारात आवश्यक पोषणमूल्यांचा अभाव आढळून आला. ठरविलेल्या शासन मान्य मेनूचे सर्रास उल्लंघन होत असून डाळी, भाज्या, दूध, फळे यांचा अभाव आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस फक्त बटाट्याची भाजी देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. आमच्या समक्ष ४७५ विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळच्या जेवणासाठी केवळ १० किलो बटाटे आणण्यात आले, ही बाब गंभीर असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचे स्पष्ट होते. मांसाहारी जेवण देण्यात येत नसल्याचीही तक्रार आहे.
स्वयंपाकगृहात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून फुटलेली भांडी, जुने व अपुरे साहित्य वापरात असल्याचे आढळून आले. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जेवणाचे प्रमाण अपुरे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची शुद्ध व नियमित सोय नाही, ही बाबही चिंताजनक आहे.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, स्वेटर, बूट व सॉक्स उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच शौचालये व स्नानगृहे अपुरी व अस्वच्छ, वर्गखोल्यांतील पंखे व लाईट्स निकामी, खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य उपलब्ध नाही, तर आरोग्य सुविधा व प्रथमोपचार साहित्याचाही अभाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे शाळेत नियमित मुख्याध्यापकही कार्यरत नाहीत.
वरील सर्व बाबी अत्यंत गंभीर असून, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क डावलले जात आहेत. त्यामुळे बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अन्वये संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार नितीन पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनमानाशी होणारा हा प्रकार थांबवावा, अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


