मनखेडच्या उपसरपंचाचा थेट उपोषणाचा इशारा जाहुले–दांडीचीबारी रस्ता चार महिन्यात उखडला; नव्या रस्त्याची मागणी तीव्र
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

मनखेडच्या उपसरपंचाचा थेट उपोषणाचा इशारा
जाहुले–दांडीचीबारी रस्ता चार महिन्यात उखडला; नव्या रस्त्याची मागणी तीव्र
सुरगाणा तालुक्यातील मनखेड येथील उपसरपंच जयराम भोये यांनी जाहुले ते दांडीचीबारी या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या दुरवस्थेवरून थेट अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मे महिन्यात नव्याने तयार झालेला हा रस्ता अवघ्या चार-पाच महिन्यांत पूर्णपणे उखडून गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता, “आमदार किंवा खासदाराकडे जा, काही होणार नाही,” असे उत्तर मिळाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या निष्क्रीयतेमुळे ग्रामस्थांमध्ये लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली असून, “निवडून दिले हीच चूक झाली का?” असा प्रश्न जनतेच्या मनात घर करू लागला आहे.
रस्त्यासह पाणी, वीज, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
उपसरपंच जयराम भोये यांनी प्रशासनाला चार ते पाच दिवसांचा अवधी देत स्पष्ट इशारा दिला आहे—
“रस्त्याची दुरुस्ती नव्हे, तर नवा रस्ता तयार करा; अन्यथा मी अमरण उपोषणास बसणार.”ग्रामस्थ आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे अपेक्षेने पाहत आहेत.



