अतिदुर्गम सुरगाण्यात ‘१०८’ सेवा केवळ नावालाच! रुग्णांचे जीव धोक्यात, लोकप्रतिनिधींचे डोळे मिटलेलेच…
लक्ष्मण बागुल (९८२३७७९२०२)
सुरगाणा तालुका हा अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. मात्र या भागातील जीव वाचवणारी १०८ रुग्णवाहिका सेवा आज तोकडी, मोडकी आणि अक्षरशः निष्क्रिय अवस्थेत आहे. आपत्कालीन प्रसंगी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
१०८ सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने रुग्णांना खाजगी वाहनांच्या दयेवर सोपवले जात आहे. मात्र, हे खाजगी वाहनांचे भाडे सर्वसामान्य आदिवासी व गरीब कुटुंबांना परवडणारे नसून, अनेक वेळा पैशाअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल करायचा म्हटले, तर १०८ न मिळाल्यास रुग्णाचा जीव की खिशातील पैसे—हा कठीण प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहत आहे.
विशेष म्हणजे, गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त, गरोदर माता यांना वेळेत उपचार मिळणे अत्यावश्यक असतानाही, प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र ‘बघ्याची भूमिका’ घेत असल्याचे चित्र दिसत आहे. कागदोपत्री योजना कागदावरच शोभून दिसत असून, प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर रुग्ण तडफडताना पाहण्याची वेळ जनतेवर येत आहे.
‘विकासाचे ढोल पिटणारे लोकप्रतिनिधी सुरगाण्यातील या गंभीर समस्येकडे का डोळेझाक करत आहेत?’ असा सवाल आता संतप्त जनतेतून होत आहे. जीव वाचवणारी सेवा जर वेळेवर मिळत नसेल, तर अशा योजनांचा उपयोग तरी काय, असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरगाण्यातील १०८ सेवेतील त्रुटी तात्काळ दूर करून पुरेशा व सक्षम रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिक देत आहेत.