हतगड येथे भूमिअभिलेख विभागाकडून वनपट्टा क्षेत्रीय मोजणीला प्रारंभ वनपट्टा धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हतगड येथे भूमिअभिलेख विभागाकडून वनपट्टा क्षेत्रीय मोजणीला प्रारंभ
वनपट्टा धारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरगाणा तालुक्यातील हतगड येथे भूमिअभिलेख विभागामार्फत वनपट्टा क्षेत्रीय मोजणी कामास प्रारंभ झाला असून, या कामाला वनहक्क दावेदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ तसेच सुधारित नियम २०१२ यांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय वनहक्क समितीने पात्र ठरविलेल्या मौजे हतगड, साजोळे, गायदरपाडा, पासोडी पाडा, पोहाळी व राहुडे या गावांतील वनहक्क दाव्यांचे मोजणी काम भूमिअभिलेख कार्यालय, सुरगाणा यांच्याकडून सुरू आहे.
या प्रक्रियेमुळे वनहक्क दावेदारांना त्यांच्या जमिनींची अचूक मोजणी व नोंद मिळणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेले वनपट्टे प्रत्यक्षात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मोजणीदरम्यान दावेदारांची उपस्थिती व सहकार्य उल्लेखनीय आहे.
यावेळी उपअधीक्षक भूमिअभिलेख, सुरगाणा भगवान भोये, भूमिअभिलेख कर्मचारी डी. एस. ठाकरे, श्रीमती जे. जे. जाधव, वनरक्षक गणेश भोये, हतगड वनसमिती अध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्यासह पांडुरंग पवार, रंगनाथ पवार, पृथ्वीराज पवार, सखाराम धुळे, विलास दळवी, राजू पीठे, पुंडलिक गांगुर्डे, रमेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने परिसरातील आदिवासी व पारंपरिक वननिवासींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



