आंबेदिंडोरी ग्रामपंचायतीला ग्रामसदस्यांनी ठोकले टाळे ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात सरपंचांसह ग्रामस्थांचा संताप

आंबेदिंडोरी ग्रामपंचायतीला ग्रामसदस्यांनी ठोकले टाळे
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात सरपंचांसह ग्रामस्थांचा संताप
दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला मंगळवारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले. ग्रामविकास अधिकारी संतोष पिंगळे यांच्या कथित अनागोंदी व निष्काळजी कारभाराविरोधात हा संताप व्यक्त करण्यात आला.
ग्रामविकास अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. तसेच शासकीय आदेश असतानाही विविध जयंती उत्सव व शासकीय कार्यक्रम राबविले जात नसल्याचा आरोप सरपंच मंगेश कराटे यांनी केला आहे. ग्रामसभा नियोजित असतानाही संबंधित अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, नागरिकांनी सरपंच व सदस्यांना पाठिंबा देत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी सरपंच मंगेश कराटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य मोतीराम पिंगळ, सागर गायकवाड, विलास खर्डे, सुनील फसाळे, योगेश डंबाळे, पंडित वाघ, एकनाथ शिंदे, विलास वाघ, शशिकांत डोळस, सुनील नवत्रे, राजेंद्र वाघे, यादव कोकाटे, प्रकाश वाघ, संतोष गवे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.


