अभोणा पोलिस ठाणे हद्दीतील कनाशी, गोळाखाल व पिंपळे खुर्द येथे अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारू व हातभट्टीच्या गावठी दारू अड्डयांवर छापे मारून २९ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परिसरात दारू विक्री, मटका, जुगार, गौण खनिज व गोतस्करीसारख्या अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांकडून कुठलीही ठोस कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अभोणा पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. कनाशी येथील दोघांकडून देशी प्रिन्स संत्रा दारू बाटल्या व रोकड असा १७,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोळाखाल गावातील एका महिलेच्यां घरात विक्रीसाठी आडोशात दडवून ठेवलेल्या देशी प्रिन्स संत्रा दारूच्या बाटल्यांचा १२८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पिंपळे खुर्द येथे घराच्या पडवीत विक्रीसाठी साठवून ठेवलेले १० हजार आठशे रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त करून गुन्हा दाखल केला.