आरोग्य प्रशासनाने घेतला गर्भवती महिलेचा बळी
पळसन, सुरगाणा व जिल्हा रुग्णालयात योग्य वेळी उपचार नाही

प्रतिनिधी | बोरगाव (मुख्य संपादक, लक्ष्मण बागुल)
सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वांगण सुळे येथील गर्भवती महिलेला तालुक्यातील पळसन व सुरगाणा येथे योग्यवेळी उपचार न मिळाल्याने तिचा आरोग्य प्रशासनाने बळी घेतला आहे याबाबत परिसरात आरोग्य विभागाच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वांगण सुळे येथील महिला रुक्मिणी पंकज गावित (२२) हिला बाळंतपणासाठी नातेवाईकांनी पळसन आरोग्य केंद्रात सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर) दाखल केले होते. या ठिकाणी गर्भवती महिलेला पहाटे पाच ते सकाळी दहा पर्यंत कोणतीही वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. नातेवाईकांनी नाइलाजास्तव गर्भवती महिलेस सकाळी ११ वाजता सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात या महिलेने सायंकाळी पाच वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, आईला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनी सुरगाणा येथे या महिलेवर उपचारासाठी योग्य प्रकारची औषधे सोयीसुविधा नसल्याने तिला नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेतला. नाशिकला पाठवण्यासाठी ॲम्बुलन्स दिली. मात्र त्या ॲम्बुलन्समध्ये डॉक्टर किंवा नर्सची सुविधा नव्हती. गर्भवती महिलेला तिचे आई-वडील, सासू-सासरे नाशिकला घेऊन येत असतानाच म्हसरूळजवळ ती बेशुद्ध झाली. नाशिक जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर एक ते दीड तास काही उपचार झाले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नवजात बालकास जिल्हा रुग्णालयातून पेठ रोडवरील नामको हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल करण्यात आले आहे. सुरगाणा येथे करोडो रुपये खर्च करून दवाखाना उभारला आहे. विशेष म्हणजे दिंडोरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले खासदारांनी केंद्रात आरोग्य मंत्रीपद सांभाळले होते. तरीही सुरगाणा येथे नागरिकांना योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने या महिलेचा बळी आरोग्य प्रशासनाने घेतल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
–
माझ्या मुलीला पळसन सुरगाणा यासह जिल्हा रुग्णालयात सुद्धा योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झालेला आहे. शासन फक्त करोडो रुपये खर्च करून इमारती बांधत आहेत. मग आरोग्य सुविधा का देत नाहीत. प्रशासनाने माझ्या मुलीचा बळी घेतला आहे
– नारायण बनसू धूम, वांगन सुळे, ता. सुरगाणा



