शिंदे दिगर एकलव्य मॉडेल रेसिडेंशीयल स्कुलचा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत हॅण्डबॉलमध्ये दुहेरी विजय
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल
नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या पाचव्या राज्यस्तरीय ईएमआरएस क्रीडा स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, शिंदे दिगरच्या (ता. सुरगाणा) विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतपद मिळवले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३७ शाळांतील २८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण २२ क्रीडा प्रकारात खेळाडूंनी भाग घेतला. हँडबॉलमध्ये अजिंक्यपदाचा मान एकलव्य शाळा शिंदे दिगरच्या मुलांच्या हँडबॉल संघाने मिळवला. भाडणे विभागाला पराभूत करत राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले. या विजयी संघात सुरेश गावित, निरंजन गायकवाड, गौरव चौधरी, संजय गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, सुशील भोये, योगेश भोये, तुषार जाधव, वामन भोये व गोविंद महाले यांचा समावेश होता.
मुलींच्या हँडबॉल संघानेही बोरगाव बाजार विभागाला पराभव करत विजेतेपद मिळवले. या संघात तुळसा चौधरी, पल्लवी महाले, सायली थवील, प्रियांका गायकवाड, मालती जाधव, दीक्षा चव्हाण, अनुसया टोपले, सलोनी गावित, चेतना चौधरी व पूनम कुवर यांचा समावेश होता. योग क्रीडा प्रकारात रितेश धूम व मयूर पवार यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. बॅडमिंटनमध्ये भूषण गावित याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. या खेळाडूंना प्राचार्य प्रशांत सावळे व क्रीडा शिक्षिका हेमा गौर यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या. शिंदे दिगर ही शाळा सध्या सटाणा तालुक्यातील अजमीर सौदाने येथे कार्यरत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

