
ऑनलाइन शॉपिंगच्या फसव्या लिंकने ‘सायबर फ्रॉड’चा वाढता धोका!
ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली फसव्या लिंकचा धुमाकूळ सुरू असून, या लिंक उघडल्यास मोबाइल हॅक होऊन बँक खाते रिकामे करण्याच्या घटना समोर येत आहेत. मेशो कंपनीच्या नावाचा गैरवापर करून सायबर माफिया सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. वैयक्तिक क्रमांकांवर येणाऱ्या या लिंक उघडताच फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होते.
यापूर्वी आरटीओ इ-चलन पावतीच्या नावाखाली आलेल्या फसव्या फाईलमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले होते. वाहनाचा नंबर टाकून पाठवली जाणारी पावती वापरकर्ते डाउनलोड करताच त्यांचा मोबाइल हॅक होऊन खाते रिकामे झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, मोबाइलवर (Meesho) किंवा इतर कोणत्याही अज्ञात लिंक आल्यास त्या उघडू नयेत, मेसेजला उत्तर देऊ नये, असे सुरगाणा पोलिस स्टेशनचे निरीक्षक समाधान नागरे यांनी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, हा मोठा सायबर फ्रॉड असून निष्काळजीपणामुळे बँक खात्यातील रक्कम गमावण्याचा धोका वाढतो.



