करंजी येथे श्री दत्त जयंती उत्साहात; दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती
वणी प्रतिनिधी संदीप तिवारी

करंजी येथे श्री दत्त जयंती उत्साहात; दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती
दिंडोरी तालुक्यातील महर्षी कर्दम ऋषींचे आश्रम व दत्तात्रयांचे आजोळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या करंजी येथे यावर्षी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी श्री दत्तांचे दर्शन घेतले, तर दोन लाखांच्या जवळपास भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
पहाटे चार वाजता दत्त्यागास सुरुवात झाली आणि साडे आठपर्यंत तो अखंड सुरू होता. त्यानंतर विधिवत पूजा व सकाळी नऊ वाजता महापूजा करण्यात आली. ह. भ. प. अभिजित महाराज राजापूरकर यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आठवडाभर कीर्तन व धार्मिक कार्यक्रम पार पडले.
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गोपाळकाला आणि काल्याचे कीर्तन यांना भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दुपारी बारा वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली आणि एक लाख पंच्याहत्तर हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प. पू. शिवदास महाराज यांच्या संकल्पनेनुसार करंजी येथे वर्षानुवर्षे वैदिक पद्धतीचे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. येथील जिवंत गोड्या पाण्याची ‘गंगा’ म्हणून ओळखली जाणारी जलधारा आणि जगात एकमेव असलेली श्री दत्तात्रयांची पद्मासन स्थित मूर्ती हे या देवस्थानाचे विशेष आकर्षण आहे.
उत्सव काळात प. पू. शिवदायल स्वामी, सद्गुरू रामचंद्र महाराज, प. पू. जोशी महाराज यांनी जोपासलेल्या परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पडले. पार्किंग व्यवस्थापन उत्तम असल्याने भाविकांना कोणताही त्रास झाला नाही.
पहाटेपासून सुरू असलेला उत्सव सुमारे साडेअकरा-बारा वाजेपर्यंत अखंड सुरू राहिला. यावेळी करंजी येथून गडावर भगवतीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक पुन्हा करंजीत परत आल्याने वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले.
— दत्तात्रय पाटील, अध्यक्ष, करंजी देवस्थान



