
*सत्य वास्तव*
*पेठ तालुक्यातील बेहडपाड्यात सुविधांचा वानवा*
पेठ तालुक्यातील बेहडपाडा येथे विविध सुविधांची वानवा असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षणाचा अभाव असल्याने त्वरीत प्रशासनाने याकडे लक्ष देवून हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
पेठ तालुक्यातील गु्रप ग्रामपंचायत कायरे, सादडपाडा अंतर्गत येणार्या बेहडपाडा या सुमारे 40 घरांच्या लोकवस्तीला आजही पक्क्या रस्त्याच्या अभावामुळे मुलभूत गरजा भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नदीकिनारी वसलेले या गावाकडील पक्क्या रस्त्यांचा अभाव जाणवतो. येथील राहणार्या ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते, पाणी, आरोग्यं, शिक्षणाचा अभाव असल्याने बेहडपाड्यातील ग्रामस्थांचा संघर्ष थांबणार कधी? असा सवाल ग्रामस्थ करीत आहे. पावसाळ्यात या गावातील रुग्ण, गरोदर महिलांना झोळीत टाकून किंवा खांद्यावर घेऊन डोंगरदर्यातून पाच किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.येथे सावर्णा – झरी मार्गावर पोहोचून नंतरच खाजगी वाहने मिळते. कधी तरी ती वाहने सुध्दा वेळेवर मिळत नसल्याने रुग्णालयात पोहचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही. त्याचप्रमाणे कुंभाळेतील आरोग्य केंद्र किंवा पेठ येथील ग्रामीण रुग्णालय गाठावे लागते. यामुळे गंभीर आजारपणाच्या वेळी वेळ वाया जातो. शाळेत जाण्यासाठी वाहन सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावातील पंधरा ते वीस विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इतर गावांना जातात, मात्र वाहनांच्या सुविधेच्या अभावामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. पाण्याचा अभाव असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांसह मुलींना डोंगर उतरुन नदी किनारी असलेल्या दोन हातपंपावर जावे लागते. डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत असल्याने मुली व महिलांची तारांबळ उडते. पिण्याच्या पाण्याचा विंहीरीचा अभावही गावातील मोठी समस्या आहे. पावसाळ्यात गावात चारचाकी आणि दुचाकी वाहने बंद असतात. खराब रस्त्यामुळे वाहन मिळणे अत्पल्प आहे. त्यामुळे या गावात दळणवळण सुविधा नाही. याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी केली असता याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून त्वरीत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



