नाशिक–पेठ–धरमपूर मार्गावरील सावळ घाटाला पर्यायी रस्ता द्यावा
मंत्री नरहरी झिरवाळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

नाशिक–पेठ–धरमपूर मार्गावरील सावळ घाटाला पर्यायी रस्ता द्यावा
मंत्री नरहरी झिरवाळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी
नाशिक–पेठ–धरमपूर या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने तसेच सावळ घाटातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन समस्येबाबत सविस्तर चर्चा केली व सावळ घाटाला पर्यायी रस्ता देण्याची मागणी असलेले निवेदन सादर केले.
पेठ आणि धरमपूर हे दोन्ही आदिवासी व ग्रामीणबहुल भाग असून हा मार्ग महाराष्ट्र–गुजरात राज्यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढली आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. प्रवासाचा वेळ दुपटीने वाढत असून वारंवार होणारे लहान–मोठे अपघातही चिंतेचा विषय बनले आहेत. विशेषतः रुग्णवाहिकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे कठीण जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, “रस्त्याचे काम तातडीने हाती घेतले नाही, तर स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. पर्यायी मार्गाची तातडीने उभारणी आणि विद्यमान रस्त्याचे त्वरित दुरुस्तीकरण आवश्यक आहे.”केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दाखवत संबंधित विभागांकडून आवश्यक तपासणी व पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.सावळ घाटातील कोंडी आणि नाशिक–पेठ–धरमपूर मार्गावरील वाढत्या अपघातांना आळा बसावा, तसेच नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा स्थानिकांमधून व्यक्त केली जात आहे.



