समृद्धी महामार्गावर टायर फुटून भीषण अपघात; बहिण-भाऊ ठार
लग्नासाठी जाताना सिन्नरजवळ दुर्घटना; ६ बालकांसह ९ जण गंभीर

समृद्धी महामार्गावर टायर फुटून भीषण अपघात; बहिण-भाऊ ठार
लग्नासाठी जाताना सिन्नरजवळ दुर्घटना; ६ बालकांसह ९ जण गंभीर
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात रविवारी (दि. १४) सकाळी सुमारे ११.४० वाजता कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. या अपघातात सहा बालकांसह नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईहून सिन्नरकडे वेगात निघालेल्या कारचे डाव्या बाजूचे पुढील टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार समोरील अवजड वाहनास जोरात धडकली. या दुर्घटनेत नीलेश विजय बुकाणे (३८, रा. मिलिंदनगर, कल्याण) आणि वैशाली सचिन घुसळे (३५, रा. चिंचपाडा, कल्याण) या सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू झाला.
कल्याण येथील ११ जण सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले होते. अपघातानंतर जखमींना तत्काळ सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी नेत असतानाच नीलेश बुकाणे यांचा मृत्यू झाला, तर वैशाली घुसळे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार गरुड, उपनिरीक्षक नीलेश देशमुख तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक मिलिंद सरवदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त कारची अवस्था अत्यंत विदारक असल्याने पत्रे कापून जखमींना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी लहान मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
जखमी :
छाया नीलेश बुकाणे (३०), सचिन घुसळे (४०), अर्णव नीलेश बुकाणे (१४), गोल्डी नीलेश बुकाणे (१०), सुयश घुसळे (३), निरव गायकवाड (१०), मनस्वी गायकवाड (५), साची सचिन घुसळे (९) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक प्रशांत शिरसाट (३२) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.



