ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी पौष्टिक मिष्ठान्न भोजन; उपस्थिती १०० टक्के
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत साजोळे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी पौष्टिक मिष्ठान्न भोजन; उपस्थिती १०० टक्केग्रामपंचायत साजोळे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी लोकसहभागातून मिष्ठान्न भोजन व पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू, फळे, गोड रवा, उपमा आदी पौष्टिक पदार्थ दिले जात असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच शालेय उपस्थितीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत स्वखर्चाने शालेय विद्यार्थ्यांना आहार वाटप करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दर शनिवारी वेगवेगळे पदार्थ मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, शाळेतील उपस्थिती १०० टक्के राहू लागली आहे.
ग्रामपंचायत अधिकारी वैशाली देवरे यांच्या कल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम प्रत्यक्षात उतरवण्यात आला आहे. या उपक्रमाला ग्रामपंचायत साजोळेच्या उपसरपंच पुष्पा गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर गायकवाड, मंगल दळवी, सविता भोये, पंढरीनाथ दळवी, सिताराम वाघमारे, मनीषा गायकवाड यांचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम ठाकरे, चौधरी सर, दत्तू गावित आणि गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत प्रभावी अंमलबजावणीसाठी एकोप्याने सहकार्य केल्यामुळे साजोळे ग्रामपंचायत राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी एक आदर्श ठरत आहे.


