अर्धवर्ष उलटले तरी आश्रमशाळांना गणवेश नाही; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यभर चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्षाला सहा महिने उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपलब्ध न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासन पातळीवर दरवर्षी ‘गणवेश वेळेत’ देण्याचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना आजही गणवेशविहीन स्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
परिणामी विद्यार्थ्यांना जुन्या कपड्यांमध्ये किंवा असमान पोशाखात शाळेत हजेरी लावावी लागत असून शाळांच्या शिस्तीवरही याचा परिणाम जाणवत आहे.
पालकांनी या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत, आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे इतक्या हलगर्जीपणे पाहणे अमान्य असल्याचे सांगितले. “दरवर्षी हीच परिस्थिती; मग बदल नक्की कुठे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.