ब्रेकिंग न्यूज,कळवण प्रकल्पातील पेसा क्षेत्रात वेतन निश्चितीच्या नावाखाली ‘टक्केवारीचा खेळ’?
प्रति कर्मचारी लाखोंच्या फरकावर तीन टक्के ‘फिक्स’ मागितल्याची परिसरात चर्चा

कळवण प्रकल्पातील पेसा क्षेत्रात वेतन निश्चितीच्या नावाखाली ‘टक्केवारीचा खेळ’?
प्रति कर्मचारी लाखोंच्या फरकावर तीन टक्के ‘फिक्स’ मागितल्याची परिसरात चर्चा
कळवण प्रकल्पातील पेसा क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती, वेतन पडताळणी व कर्मचारी मान्यता प्रक्रियेत गंभीर आर्थिक गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे. प्रति कर्मचारी पाच हजार रुपये आकारणी, तसेच वेतन फरकावर थेट तीन टक्के रक्कम देण्याची अट असल्याचे आरोप चर्चेत आले आहेत.
पेसा क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे शंभरहून अधिक असून, वेतन निश्चितीच्या प्रक्रियेसाठी प्रति कर्मचारी पाच हजार रुपये मागितले जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे वेतन निश्चितीनंतर पगारात फरक टाकायचा असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तीन टक्के ‘फिक्स’ रक्कम द्यावी लागते, अशी अघोषित अट असल्याचे सांगितले जात आहे.
चर्चेनुसार, ही रक्कम दिली नाही तर वर्षानुवर्षे काम प्रलंबित ठेवले जाते; मात्र पैसे दिल्यास अवघ्या आठ दिवसांत काम पूर्ण होते, असा आरोपही करण्यात येत आहे. प्रति कर्मचारी वेतन फरकाची रक्कम अंदाजे दहा लाख रुपयांपर्यंत जात असून, त्यावर तीन टक्के म्हणजे हजारो रुपयांची ‘देवाणघेवाण’ होत असल्याची चर्चा आहे.
या कथित प्रकारामुळे पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, गरीब व आदिवासी कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवरच डल्ला मारला जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आता या चर्चांना वास्तवाचा आधार आहे की नाही, याची सखोल चौकशी होणार का, याकडे संपूर्ण कळवण प्रकल्पाचे लक्ष लागले आहे. वर्षं वर्ष सुरू असलेली परंपरा खंडित होणार का हा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.



