३१ डिसेंबरला रात्रभर सेलिब्रेशन मद्यविक्रीला रात्री १, तर बिअर बार पहाटे ५ पर्यंत खुले

३१ डिसेंबरला रात्रभर सेलिब्रेशन
मद्यविक्रीला रात्री १, तर बिअर बार पहाटे ५ पर्यंत खुले
मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात उत्साहाची लाट पसरली आहे. तरुणाईसह नागरिक नववर्षाच्या जल्लोषासाठी सज्ज झाले असून, ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून १ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत ‘सेलिब्रेशन’ करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या सेलिब्रेशनसाठी कडक अटी-शर्ती लागू करण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार परवानाधारक वाइन शॉपना मद्यविक्रीसाठी मध्यरात्री १ वाजेपर्यंत, तर परमिट बिअर बारना पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तथापि, कोणतीही सेलिब्रेशन पार्टी आयोजित करायची असल्यास पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यतस्करीची शक्यता लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कडक नाकाबंदी व गस्त वाढविली आहे. अधीक्षक संतोष झगडे यांच्या आदेशानुसार परराज्यातून नाशिकमार्गे अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली असून, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर, दिंडोरी , सुरगाणा परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल्स व फार्महाउसची कसून तपासणी सुरू आहे. विना परवाना मद्यविक्री किंवा अवैध मद्यपान आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
मद्यपानासाठी आवश्यक परवाने ऑनलाइन उपलब्ध असून, परवाना नसलेल्या मद्यपींवर उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. मद्यपानाचा एकदिवसीय परवाना मद्यविक्री दुकानात तसेच ई-स्वरूपातही मिळणार आहे. त्यासाठी
https://exciseservices.mahaonline.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, शहर आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, तर ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार नववर्षाच्या पार्ट्यांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. गुन्हेशाखेची पथके अमली पदार्थांच्या वापरावर विशेष लक्ष ठेवणार असून,
मद्यपी, टवाळखोर व धिंगाणा करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
विनोद पाटील, पोलिस निरीक्षक सुरगाणा


