विनापरवाना रोलरचा महामार्गावर धुडगूस प्रशासनाची बघ्याची भूमिका; ग्रामीण रस्त्यांचे तीनतेरा
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

विनापरवाना रोलरचा महामार्गावर धुडगूस
प्रशासनाची बघ्याची भूमिका; ग्रामीण रस्त्यांचे तीनतेरा
रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या रोलर वाहनांना केवळ अधिकृत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच परवानगी असते, हा स्पष्ट नियम असताना ग्रामीण भागात मात्र महामार्गांवर विनापरवाना रोलर गाड्यांचा उघड उघड धुडगूस सुरू आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही जड वाहने महामार्गांवर धाववली जात असून, त्यातून नव्याने तयार झालेले रस्ते चक्क उध्वस्त होत आहेत.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर रोलर चालविणे म्हणजे शासनाच्या पैशांची थेट माती करणेच असल्याचा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यांवर भेगा, खड्डे आणि पृष्ठभागाचे सोलले जाणे हे नित्याचे झाले असून, सर्वसामान्य वाहनचालक मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा यांना या प्रकाराची पूर्ण माहिती असतानाही कारवाई मात्र शून्य आहे. ‘वरदहस्त’ असल्यामुळेच ही बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे का, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वेळीच नियंत्रण आणले नाही तर ग्रामीण भागातील महामार्ग अक्षरशः निकामी होतील आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ विनापरवाना रोलर चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांतील संताप उग्र आंदोलनाचे स्वरूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.



