आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशनकडून अग्निपीडित जेष्ठ नागरिकास मदतीचा हात
ठाणगाव प्रतिनिधी नामदेव पाडवी

आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशनकडून अग्निपीडित जेष्ठ नागरिकास मदतीचा हात
सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा (पो. हस्ते) येथील रहिवासी जेष्ठ नागरिक श्री. अर्जुन महादु जाधव (वय ८०) यांच्या घराला दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी अचानक गॅस सिलिंडरचा भडका होऊन भीषण आग लागली. या आगीत घरातील धान्य, भांडी, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे तसेच जीवनावश्यक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची माहिती मिळताच गावकरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. श्री. जाधव हे एकटे राहत असल्याने या दुर्घटनेनंतर त्यांच्या समोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
या संकटाच्या काळात गावकरी, नातेवाईक व समाजबांधवांनी मदतीचा हात पुढे केला. तसेच आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन, नाशिक जिल्हा व मित्र परिवार (सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर) यांच्या वतीने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत मदतीचे आवाहन करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी संकलन करून पीडित कुटुंबाला मदत करण्यात आली.
आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशनचे सचिव श्री. बापू गारे यांच्या हस्ते पीडित अर्जुन जाधव यांना १८,६२२ रुपयांचा धनादेश तसेच ४,४६० रुपयांचा किराणा साहित्याचा संच देण्यात आला. याशिवाय आयडियाझम सामाजिक संस्था, नाशिक जिल्हा यांच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक श्री. नारायण गभाले यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन अर्जुन बाबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.
“एक हात मदतीचा – लोकसहभागातून लोकहिताकडे” या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचा हा उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या प्रसंगी नामदेव पाडवी, सरपंच श्री. पांडुरंग गावीत, फाऊंडेशनचे सदस्य, मित्र परिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



