स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष द्या आ. नितीन पवार यांचे आवाहन; सुरगाण्यात विकासकामांचे लोकार्पण

स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष द्या
आ. नितीन पवार यांचे आवाहन; सुरगाण्यात विकासकामांचे लोकार्पण
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर शिक्षणाकडे अधिक लक्ष केंद्रित करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले. सुरगाणा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी झेंडा चौकात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मोहन पिंगळे होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष मनोज शेजोळे, सचिन महाले, विजय कानडे, सुरेश गवळी, दिनकर पिंगळे, रमेश थोरात, जिजा कोल्हे, रंजना लहरे, जयश्री शेजोळे, योगिता पवार, बाळू तात्या, आनंदा झिरवाळ, रामदास केंगा, निलेश करवंदे, धनराज कानडे आदी उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले, पुढील काळात परदेशी तसेच खासगी विद्यापीठे भारतात येणार असून शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. आदिवासी विकास खात्याच्या अनेक शासकीय आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जा समाधानकारक नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांची बैठक घेऊन शिक्षक संघटनांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतले जातील.
शहराच्या विकासासाठी पक्षभेद व गटतट विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना त्यांनी शहरात उपजिल्हा रुग्णालय, तंत्रनिकेतन, न्यायालय, व्यापारी तत्त्वावर गाळ्यांची उभारणी, घाटमाथ्यावर औद्योगिक वसाहत तसेच शहरासाठी २० कोटी रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. गट क्रमांक शंभरमधील जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले.



