डांग जिल्ह्यातील सापुतारा पोलिसांची मोठी कारवाई आंतरराज्य घरफोडी टोळीचे तीन आरोपी अटकेत; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
सापुतारा पोलीस पथकाची रणनीती यशस्वी; दोन आरोपी फरार

डांग जिल्ह्यातील सापुतारा पोलिसांची मोठी कारवाई
आंतरराज्य घरफोडी टोळीचे तीन आरोपी अटकेत; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
सापुतारा पोलीस पथकाची रणनीती यशस्वी; दोन आरोपी फरार
डांग जिल्ह्यातील सापुतारा पोलीस स्टेशनच्या पथकाने आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीतील तीन आरोपींना अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत पोलिसांनी 20 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर डांग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पूजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.डी. गोंडलीया यांच्या नेतृत्वाखालील पथक सापुतारा चेक पोस्टवर वाहन तपासणी करत होते. यावेळी महाराष्ट्राकडून येणारी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई क्रेटा कार (क्रमांक GJ-20-CB-2646) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयते (गणेशीयू) आढळून आले.
संशय बळावल्याने वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता चालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सापुतारा पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत वाहन अडवून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी दोन आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.
अटकेत घेतलेले आरोपी अनिलभाई रेवाभाई भाभोर (वय २७), वकील तेरसिंग भाभोर (वय ३२) आणि मिथुनभाई मनुभाई भाभोर (सर्व रा. गरबाडा, जि. दाहोद) असून कमलेशभाई दिपाभाई भाभोर व कांती तेरसिंग भाभोर यांना वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.
या आरोपींचा गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत आरोपींनी २६ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील ‘यशवंतनगर बी.एस. कन्स्ट्रक्शन’ कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली असून या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण रु. २०,३६,६८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये
रोख रक्कम : रु. ५,१३,१८०/-
ह्युंदाई क्रेटा कार : रु. १५,००,०००/-
चांदीच्या दोन साखळ्या : रु. १०,०००/-
तीन मोबाईल फोन व चोरीसाठी वापरलेली साधने (कोयते, पकड, बुकानी, मास्क) यांचा समावेश आहे.
ही उल्लेखनीय कारवाई सापुतारा पोलीस स्टेशनचे पी.आय. पी.डी. गोंडलीया आणि त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाशी समन्वय साधून अधिक कारवाई सुरु करण्यात आली आहे.



