बोरगाव येथे सराफी दुकान फोडले; चांदी-सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

बोरगाव येथे सराफी दुकान फोडले; चांदी-सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील अभोणा रोडलगत असलेल्या एकविरा ज्वेलर्स या सराफी दुकानावर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास डल्ला मारत तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही चोरी २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून २९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे वती व कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील रॅक व ड्रॉवरचे कुलूप उचकटून दागिने व रोख रक्कम लंपास केली.
चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपये किमतीचे चांदीचे देव, ४० हजारांचे चांदीचे अंगठे, ३२ हजारांचे चांदीचे तोरडे, मासोळ्या व चांदीची साखळी, तसेच सोन्याचे डोरले, वाटी जोड व मणी, तसेच १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २,६१,००० रुपयांचा माल चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दुकानाचे मालक गौरव देविदास जाधव (वय २८, व्यवसाय – व्यापार, रा. बोरगाव, ता. सुरगाणा) यांनी सुरगाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज जे. कुवर करीत आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील हालचालींचा पोलिसांकडून सखोल आढावा घेतला जात आहे.



