# नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध – आवाज जनतेचा
आपला जिल्हाविशेष वृतान्त

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध

नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध

बोरगाव | लक्ष्मण बागुल
गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नार-पार-गिरणा (Nar Par Girna) या नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटींचे टेंडर (Tender) जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.
मागील वर्षी २०२४ मध्ये राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती. हा प्रकल्प नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पातून नार आणि पार या पश्चिम वाहिनी नद्यांमधील १०.७६ टीएमसी पाणी गिरणा नदीत वळवले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा तालुक्यातून वाहणाऱ्या नार, पार औरंगा व अंबिका या नद्यांचे पाणी पश्चिमेकडे अरबी समुद्रात वाहून जाते. ते पाणी पूर्वेकडील गिरणा नदीपात्रात वळवल्यास त्याचा नाशिक व जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला फायदा होईल, असा सर्व्हे नाशिक मधील हरिभाऊ जाधव यांनी १९८२ मध्ये केला होता. तेव्हापासून नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प मार्गी लागावा अशी मागणी होती.
त्यानंतर नाशिकमधील मालेगाव, देवळा, कळवण, बागलाणसह जळगाव जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा नदीजोड प्रकल्प निवडणूक प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे. नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या नाशिकमधील पेठ व सुरगाणा या तालुक्यांत उगम पावतात. पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात टाकले जाणार आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या योजनेचे टेंडर प्रसिद्ध झाल्याने आता या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नार पार नदी जोड प्रकल्पाला सात हजार ४६५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ४११६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले असून या निधीतून भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाचा आराखडा आणि बांधकाम आदींचा समावेश आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात नऊ धरणे बांधली जातील व त्या धरणांमधून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत सोडले जाईल. हे पाणी धरणे, बोगदे आणि कालव्यांच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आणले जाणार आहे.

शेअर करा.

लक्ष्मण बागुल

या पोर्टल च्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून तुमच्या जवळ असलेली बातमी मला ९८२३७७९२०२ या व्हाट्सअप नंबर पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!