त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलला ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

हरसूलला ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. सोमवारी रात्री आठच्या सुमारास तसेच मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजता असे दोन भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेची माहिती त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
मंगळवारी सकाळी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याबाबत मेरी (एमईआरआय)कडून दुजोरा देण्यात आला आहे. नाशिक भूकंप कक्षाच्या वैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर असून तो भूगर्भात ५ किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले.
गत वर्षभरापासून हरसूल, पेठ व सुरगाणा परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असून, हरसूल भागात त्याची तीव्रता अधिक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



