पेगलवाडी ते ब्रह्मगिरी पर्वत कुंभमेळ्यापूर्वी होणार रोप वे*
मुख्य संपादक लक्ष्मण बागुल

*पेगलवाडी ते ब्रह्मगिरी पर्वत कुंभमेळ्यापूर्वी होणार रोप वे*
बोरगाव | लक्ष्मण बागुल
पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या अंजनेरी ते ब्रह्मगिरी या रोप-वेमध्ये बदल करून तो आता पेगलवाडी ते ब्रह्मगिरी असा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अंजनेरी पर्वत गिधाडांचे वस्तीस्थान असल्याने या रोपवेमुळे त्यांचे अधिवास धोक्यात सापडण्याचा धोका लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने या रोप-वेला स्थगिती दिली होती. आता अंजनेरी पर्वतालगतच्या पेगलवाडी जवळून हा रोप-वे पुढे रेटला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच हा रोप-वे कार्यान्वित करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाचे नियोजन सुरू झाले आहे. अंजनेरी ते ब्रह्मगिरी दरम्यान रोप-वेची उभारणी करण्याचा प्रस्ताव तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी आणला होता.अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे दोन्ही पर्वत अतिउंचावर असल्याने मनात असूनही भाविक आणि पर्यटक त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. भाविकांना अंजनेरी आणि ब्रह्मगिरीवर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी – ब्रह्मगिरी या धार्मिक पर्वतांना जोडणारा रोप वे प्रास्तवित केला होता. भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीकडून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी जवळपास ३७६.७३ कोटींच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून जुलै २०२३ मध्ये त्याची टेंडर प्रक्रिया राबवली गेली. या प्रकल्पामुळे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ब्रह्मगिरी व अंजनेरी या पर्वतांची हानी होण्याचा धोका व्यक्त केला जात होता. अंजनेरीच्या डोंगरावर गिधाडांचा अधिवास असल्याने रोप-वेमुळे त्यांच्या वास्तव्यावर परिणाम होईल, हे लक्षात आणून देत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाला व टेंडरलाही विरोध केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तेथील पशु-पक्षांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामासंदर्भात त्रयस्थ समितीमार्फत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व अन्य दोन संस्थांची नियुक्ती करण्याचेही जाहीर केले होते. दरम्यान मधल्या काळात त्या अभ्यासातून काय निष्कर्ष निघाले ते समोर आले नाहीत. मात्र, जिल्हा प्रशासनाने गिधाडांचे अधिवास असलेला अंजनेरी पर्वताचा भाग वगळून पेगलवाडी जवळील पर्वतावरून हा रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वेक्षण झाले असून प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. पूर्वीप्रमाणे नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार आहे. सर्व्हेनुसार या रोपवेसाठी पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर व मेटघर येथे ३ हेक्टर १५ गुंठे क्षेत्र भूसंपदीत करावे लागणार आहे. पूर्वी या रोपवे ची लांबी ५.७ किलोमीटर होती. आता त्यात बदल केल्यामुळे ती लांबी चार किलोमीटरच्या आसपास होणार आहे. या प्रकल्पामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटनात वाढ होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.



