कंटेनर अनियंत्रित झाल्याने पिकअप व दुचाकीला धडक मोहदरी घाटात तिहेरी अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

कंटेनर अनियंत्रित झाल्याने पिकअप व दुचाकीला धडक
मोहदरी घाटात तिहेरी अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
नाशिक–पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात बुधवारी (दि. ३१) सकाळी भीषण तिहेरी अपघात होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घाटातील शेवटच्या वळणावर कंटेनर अनियंत्रित होऊन विरुद्ध लेनमध्ये जाऊन पिकअप व दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला.
बाळासाहेब बाजीराव व्यापारी (वय ४२, रा. सिडको, नाशिक) हे सकाळी सुमारे ९.३० वाजता भाजीपाला खरेदीसाठी पिकअप (एम.एच. १५ जी.व्ही. ७१४९) घेऊन सिन्नरमार्गे राहात्याकडे जात होते. त्यांच्या सोबत अवधूत रामनाथ निर्मळ (वय २३, रा. पिंप्री निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) हा नातेसंबंधातील युवक होता. याच वेळी सिन्नरहून नाशिककडे जाणारा कंटेनर (एम.एच. ४६ ए.आर. २७२५) वळणाचा अंदाज न आल्याने अनियंत्रित झाला व दुभाजक ओलांडून सिन्नरकडील लेनमध्ये उलटला.
उलटलेल्या कंटेनरने समोरून येणाऱ्या पिकअपला तसेच पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला (एम.एच. १५ सी.बी. ६७९६) जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप व कंटेनर दोन्ही वाहने उलटली, तर दुचाकीस्वार कंटेनरखाली दबला गेला. या अपघातात बाळासाहेब व्यापारी, अवधूत निर्मळ आणि दुचाकीस्वार शाजी फर्नांडो (वय ४५, रा. जेलरोड, नाशिकरोड) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आयटी अभियंत्याचा दुर्दैवी अंत
अपघातातील मयत अवधूत निर्मळ हा मुंबईतील एका कंपनीत नुकताच आयटी अभियंता म्हणून रुजू झाला होता. सुट्टीसाठी तो गावी जात असताना हा अपघात घडला. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती आहे.



