पालघर जिल्ह्यात ‘माझी ई-शाळा’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी; ४०० हून अधिक शाळांचा सहभाग

पालघर जिल्ह्यात ‘माझी ई-शाळा’ उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी; ४०० हून अधिक शाळांचा सहभाग
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व LTI Mindtree Foundation यांच्या संयुक्त माध्यमातून पालघर जिल्ह्यात ‘माझी ई-शाळा’ या शैक्षणिक उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. पालघर, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व वाडा या सहा तालुक्यांमधील ४०० पेक्षा अधिक शाळांमध्ये हा उपक्रम समग्र शिक्षा अभियानसोबत सहभागीदारीतून राबविण्यात येत आहे.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण डिजिटल माध्यमातून पोहोचवणे आणि या भागात निर्माण झालेली डिजिटल दरी कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. माझी ई-शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आदिवासीबहुल व दुर्गम भागांतील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ही मोठी अडचण असून, त्या ठिकाणी हे डिजिटल मॉडेल प्रभावी ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास साधता येणार आहे.
या उपक्रमात शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक तालुकास्तरावर शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात डिजिटल कंटेंटचा प्रभावी वापर, यंग इन्स्ट्रक्टर मॉडेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020), तसेच डिजिटल अभ्यासक्रम कसा वापरायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
माझी ई-शाळा उपक्रमामुळे आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळत असून, पालघर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.



