ब्रेकिंग न्यूज,बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या १५ शिक्षकांना तात्पुरती पदस्थापना
सुरगाणा तालुक्यातील ३ शिक्षकांचा समावेश

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या १५ शिक्षकांना तात्पुरती पदस्थापना
सुरगाणा तालुक्यातील ३ शिक्षकांचा समावेश
लक्ष्मण बागुल | बोरगाव(सुरगाणा)
नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या १५ शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी निलंबित केले आहे. या सर्व १५ शिक्षकांना निलंबन काळात तात्पुरती पदस्थापना देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांनी आपल्या सोयीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत सोयीनुसार शाळा निवडली होती. यामुळे इतर शिक्षकावर अन्याय झाला होता. याबाबत राज्याच्या दिव्यांग विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी याबाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आदेशित केल्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी ओमकार पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील १५ प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले आहे. या निलंबित केलेल्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात पदस्थापना विविध पंचायत समितीमध्ये देण्यात आलेली आहे. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये सुरगाणा तालुक्यातील ३, निफाड तालुक्यातील ३, सिन्नर तालुक्यातील ३, चांदवड तालुक्यातील २, नाशिक तालुक्यातील २, इगतपुरी तालुक्यातील १, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १ शिक्षकाचा समावेश आहे. निलंबित केलेल्या नीला संभाजी वाघ (पिंपळगाव बसवंत-२) यांना सिन्नर पंचायत समिती, शोभा मधुकर खैरे (लासलगाव रेल्वे स्थानक) यांना सिन्नर पंचायत समिती, जयश्री अभिमान पगार (पिंपळगाव शाळा-१) यांना येवला पंचायत समिती, संजय शंकर पवार (साप्ते, ता. त्र्यंबकेश्वर) यांना सिन्नर पंचायत समिती, भाऊसाहेब विठोबा घुमरे (चांदवड) यांना येवला पंचायत समिती, संदीप शंकराव हिरे (उसवाड, ता. चांदवड) यांना देवळा पंचायत समिती, गुलाब गंगा दळवी (शिंदे दिगर, ता. सुरगाणा) यांना कळवण पंचायत समिती, रतन जाणू पाडवी (करंजूल सू, ता. सुरगाणा) यांना दिंडोरी पंचायत समिती, केशव काशीराम भोये (जांभूळपाडा, सुरगाणा) यांना पेठ पंचायत समिती, मधुसूदन उखाजी अहिरे (गोंदे ता. इगतपुरी) यांना त्र्यंबकेश्वर पंचायत समिती, संजय जनार्दन आहेर (सामनगाव, ता. नाशिक) यांना निफाड पंचायत समिती, वैशाली सुधाकर सोनवणे (मुंगसरा, ता. नाशिक) यांना चांदवड पंचायत समिती, धारासिंग महादू राठोड (दातली, ता. सिन्नर) यांना देवळा पंचायत समिती, सुनंदा किसन आव्हाड (दापूर, ता. सिन्नर) यांना येवला पंचायत समिती तर रोहिदास विठ्ठल दौंड (डुबेरेवाडी, ता. सिन्नर) यांना चांदवड पंचायत समितीत तात्पुरती पदस्थापना देण्यात आली आहे.



