समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टँकरला आग लागून चालक-क्लिनरचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टँकरला आग लागून चालक-क्लिनरचा होरपळून मृत्यू
प्रतिनिधी बोरगाव
आज गुरुवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.२१ वाजता समृद्धी महामार्गावर नागपूर लेनवरील चॅनल क्रमांक ५६८.२ येथे भीषण प्राणांतिक अपघात झाला. मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर वाहन क्रमांक MH03 DV 8455 यास त्याच दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टँकर क्रमांक UP64 A 6841 ने पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेमुळे दोन्ही वाहने महामार्गाचे सुरक्षा कठडे तोडून खाली कोसळली. अपघातानंतर टँकरमधील ज्वलनशील द्रव पदार्थाने पेट घेतल्याने भीषण आग लागली. या आगीत टँकर चालक कृष्णा मोहन यादव (वय ४२) व क्लिनर अंतिमलाल रावत (वय २०), दोघेही रा. मध्य प्रदेश, गंभीररित्या भाजल्याने जागीच मृत्युमुखी पडले.
दरम्यान, आयशर वाहनाचा चालक सुरेंद्र यादव (वय २५) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग प्रशासन तसेच सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे दाखल करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटविण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वावी पोलीस ठाणे करीत आहेत.



